दिवाळी येणार, अंगण सजणार,
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत,
ओवाळणी थाटात घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी
रांगोळीने सजेल उंबरठा,
पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पागाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षासरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी
सनईच्या सुरांत होईल पहाट,
अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला,
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी
देवापाशी मागेन एकच दान,
भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट, नको करू ताटातूट
चंद्रज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी